किल्ले कर्नाळा आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य - Karnala Fort & Karnala Bird Sanctuary
मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात मनाला आनंद आणि खुप सोयीचे असलेले ठिकाण म्हणजे कर्नाळा. भल्या पहाटे निघाले तर एका दिवसाच्या भटकंतीत गिर्यारोहण (ट्रेकींग) आणि पक्षी निरिक्षणाचा आनंद घेता येतो.
जरा आपण या किल्ल्याच्या इतिहासात डोकावून बघूयात.
कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्यातील पनवेल तालुक्यातील आहे. प्राचीन कालखंडापासून म्हणजे यादव (इ. स. ८५० ते इ. स. १३३४) काळापासून व्यापारावरील दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला प्रसिध्द होता असा उल्लेख आढळतो.
तर असा हा किल्ला छत्रपती शिवाजी महारांनी इ. स. १६५६ साली हा किल्ला स्वराज्यात आणला. नंतर पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला, परत १६७० साली परत स्वराज्यात आणला असा हा कर्नाळा किल्ल्याचा इतिहास आहे.
ह्या किल्लावर एक सुळका आहे, तो अंगठ्या सारखा दिसतो म्हणून हल्ली Thumb Point म्हणूनही प्रसिध्द आहे. जस जसे आपण किल्ल्याच्या दिशेने प्रवास करत किल्ल्याजवळ येतो, तस तसा हा सुळका आपल्याला खुणावत राहतो. ह्या किल्ल्यावर येताना पायथ्यालाच महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे तेथेच आपल्याला उतरुन किल्ल्याच्या दिशेने कुच करावी लागते.
साधारण दिड दोन तासाच्या चढाईत विविध पक्षांचे काही ओळखीचे काही अनोळखी आवाज ऐकत आपण किल्ल्यावर पोचतो. तेव्हा जो आपल्याला खालून खुणावणारा सुळका जवळून पाहिल्यावर त्याची भव्यता लक्षात येते. किल्ला पुरातन (जुना) असल्यामुळे किल्ल्याची तटबंदी, किल्ल्यावरील वाडा तसेच इतर वास्तू ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. किल्ल्यावर देवीचे एक मंदिरही आहे.
सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी तसेच धान्य कोठरे देखील आहेत. आणि मुख्य म्हणजे जोशात येऊन सुळक्यावर चढाई करु नका. जर सोबत व्यावसायिक प्रशिक्षित गिर्यारोहक आणि योग्य साधन सामुग्री असेल तरच प्रयत्न करा अन्यथा जीवाशी खेळ होईल.
आजूबाजून नजर फिरवली तर आपल्याला माथेरान, प्रबळगड, मलंगगड, माणिकगड, राजमाची यांचेही दर्शन होते. किल्ल्यावरील परिसर बघण्यास साधारण अर्धा पाऊण तास भरपूर होतो. किल्ल्या बघून झाल्यानंतर पायथ्याला असलेल्या पक्षी अभयारण्यात पक्षी निरिक्षणास जावे.
तिथे काही पक्षी पिंजर्यातही ठेवलेले आहेत ते बघावे. हा जर तुम्ही अभयारण्यात पक्षी निरिक्षणासाठी जंगलात जाणार असाल तर जाड शूज, पूर्ण अंग झाकतील असे थोडे जाड कपडे, डोक्यावर टोपी असे सर्व परिधान करुन हातात एक काठी ही जवळ बाळगावी जेणे करुन तुम्हाला जंगलात वावरणार्या प्राण्यांपासून संरक्षण करता येईल, कारण येथील जंगलात पक्षांबरोबरच विषारी आणि बिन विषरी साप, सरडे ई. बरेच प्राणी आहेत.
पावसाळ्यात तर या अभयारण्यात मस्त हिरवी मखमल पसरलेली दिसते, आणि बर्याच ठिकाणी लहान मोठे ओढे वाहत असतात, त्यातून विहार करताना एका वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास होतो.
येथे पक्षी निरिक्षणासाठी दोन निसर्ग वाटा आहेत. एक हरियाल तर दुसरी मोरटाका. येथे जवळजवळ स्थानिक १०० ते १५० आणि हिवाळ्या दरम्यान २५ ते ३० परदेशी पक्षांच्या जाती, प्रजाती आणि त्यांच्या मोहमयी दुनियेचे दर्शन येथे होते.
तसेच किल्याच्या समोर पश्चिमेस असलेली गारमाळ वाट तर वैविध्यपूर्ण वनस्पतींनी संपन्न आहे. या अभयारण्यात जवळपास ६४२ विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती, वनौषधी, वेली आणि दुर्मीळ वनस्पती आहेत. वृक्षांची नावे लोकांना समजावी म्हणून प्राधिकरणाने वृक्षांवर त्यांच्या नावाची फलकेही लावली आहेत.
अशा या निसर्गरम्य वातावरणात पुर्ण दिवस आनंदात घालवून जड अंत:करणाने संध्याकाळी घरी परतावे लागते.
टिपणी : कृपया पर्यटकांनी किल्ला आणि अभयारण्यात कचरा करुन परिसर प्रदूशीत करु नये ही नम्र विनंती.
कसे जायचे : मुंबईपासून ६० कि. मी. अंतरावर मुंबई - गोवा महामार्गाला लागूलच हे अभयारण्य आहे. आणि पनवेल पासून केवळ २० कि. मी. अंतरावर आहे. पनवेलवरून ठिकाणी एस. टी. किंवा टमटमने जाऊ शकता.
कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही, पण जुलै ते मार्च तेथील वातावरण भ्रमंतीकरीता उत्तम असते.
जिल्हा : रायगड
राज्य : महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know