जव्हार - Jawhar
जव्हार हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेले नयनरम्य ठिकाण. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण इथल्या वारली चित्रकलेसाठीही प्रसिध्द आहे. या जव्हार संस्थनाची स्थापना १३४३ साली राजा जयाबा मुकाणे यांनी केली. राजा पतंग शाह (चौथा) आणि त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी जव्हारच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले. जव्हारचे राजा पतंग शाह (पाचवे) हे जव्हार संस्थानाचे शेवटचे राज्यकर्ते ठरले. ह्या संस्थानाने १९४७ मध्ये भारतात विलिन होईपर्यंत मागील सहाशे वर्षे बरीच स्थित्यांतरे पहिलीत.
येथील प्रेक्षणिय स्थळे :
जयविलास पॅलेस (राजवाडा)
जव्हारमधील एक मुख्य आकर्षण असलेला पाश्चात्य आणि भारतीय शैलीचा मिलाप असलेला राजा यशवंत मुकणे यांनी बांधलेला राजवाडा म्हणजेच जयविलास पॅलेस (राजवाडा). या वाड्यामधील आंतर्गत सजावट ही मुकणे परिवारातील आदिवासी राजांची समृध्द संस्कृती आणि जिवनशैलीचे दर्शन घडविते.
सनसेट पॉइंट
जव्हार शहारापासून पश्चिमेला अर्धा कि.मी. वर असलेल्या ठिकाणावरुन सुर्यास्त छान दिसतो म्हणून या ठिकाणाला सनसेट पॉइंट म्हणतात.
काळ मांडवी धबधबा
हा धबधबाही बारमाही १०० फुटावरून वाहणार्या धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात धबधब्याचा परिसर एकदम आल्हाददायक, निसर्गरम्य असे असते. काळ मांडवी धबधबा हा जव्हार-झॅप मार्गावरील आपटाळे गावाजवळ आहे.
शिरपामाळ
शिरपामाळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटीदरम्यान येथे थांबले होते म्हणून असे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ एक ऐतिहासिक ठिकाण ठरले आहे.
तर असे आहे जव्हार, तर मग कधी भेट देता...
कसे जायचे : रेल्वे मार्गाने ६० कि.मी. अंतरावर असलेल्या ईगतपुरी स्थनकात उतरून जव्हारला जाण्यासाठी टॅक्सीचा पर्याय आहे. जर आपण रस्ता मार्गे येत असाल तर जव्हार पर्यंत एस.टी. बसेसही आहेत. आणि स्वतःच्या गाडीने येत असाल तर भिवंडी-विक्रमगड मार्गे जव्हारला जाता येते.
कधी जायचे : जुलै ते फेब्रुवारी महिन्यांदरम्यान
जिल्हा : पालघर
राज्य : महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know