भंडारदरा - Bhandardara
ज्यांना मुंबई जवळचे थंड हवेचे ठिकाणी फिरायला जायचे असेल, त्यांच्यासाठी अहमदनगरमधील भंडारदरा एक उत्तम पर्याय आहे.
जर तुम्ही स्वत:ची गाडी घेऊन जात असाल तर उत्तमच कारण तुम्ही एकदा मुंबई नाशिक मार्गाला लागला की सुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा, नागमोडी वळणाचे रस्ते, पक्षांचा किलबिलाट, रस्त्याच्या कठड्यावर बसलेली माकडं आणि नुकताच जाणवू लागलेल्या थंड वार्याचा आनंद घेत, कधी भंडारदराला पोहोचलात ते कळणारसुध्दा नाही.
भंडारदरा हे प्रवरा नदीकाठी वसलेले एक गाव आहे. इथले प्रमुख आकर्षण म्हणजे ब्रिटिशांनी १९२६ साली बांधलेले आशिया खंडातील सर्वात जूने आर्थर लेक विल्सन डॅम म्हणजेच आत्ताचे भंडारदरा धरण. येथे लोक मुख्यत: सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्यावेळी भेट देतात, कारण यावेळी धरणाचे अनोखे रुप यावेळी दिसते व आपल्याला तेथे छायाचित्रण (फोटो काढण्याचा) करण्याचा मोह आवरता येत नाही. येथून जवळपास ११ कि. मी. अंतरावर रंधा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. येथे पावसाळ्यात असंख्य धबधबे पहायला मिळतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे येथे मे महिना अखेरी ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरणारा भंडारदरा काजवा महोत्सव, येथे रात्री बर्याच ठिकाणी काजव्यांचे थवेच्या थवे लुकलुकत असतात, ते बघताना एखाद्या स्वप्नवत दुनियेत आल्यासारखे वाटते, बरे ते बघताना तेथे शांतता पाळावी जेणेकरुन इतर पशूपक्षांना त्याचा त्रास होणार नाही. एक अप्रतीम असा अनुभव देणार्या या काजवा महोत्सवाला आवर्जून भेट द्या.
भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटन मंडळाने उत्तम जेवण्याची आणि राहण्याची सोय केली आहे.
भंडारदराला भेट दिल्यानंतर सगळी मरगळ कुठल्या कुठे पळून जाईल ते कळणार सुध्दा नाही आणि प्रसन्न मनाने घरी परताल.
जवळील प्रेक्षणिय ठिकाणे : छत्री धबधबा (Umbrella Waterfall), महाराष्ट्र्तील सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, रतनगड, घाटघर, दिड एकर परिसरात पसरलेल्या वडाच्या झाडासाठी पसिध्द असलेले पेमगिरी.
कसे जायचे : मुंबई पुण्या मधून भंडारदराला जाण्यासाठी एस. टी. सेवा उपल्बध्द आहेत, स्वत:चे वाहन असेल तर उत्तम.
कधी जायचे : सर्वोत्तम काळ पावसाळ्यानंतरचे तीन चार महिने
राज्य : महाराष्ट्र
जिल्हा : अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know