अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा - Alibag Geo-magnetic Observatory

    आपल्या भारत देशातले हवामान जसे आहे तसे इतर देशांमध्ये क्वचितच बघायला आणि अनुभवायला मिळतील. आपल्या देशात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आढळतात. इतर देशांमध्ये शक्यतो हिवाळा आणि उन्हाळा हेच ऋतू आढळातात आणि क्वचितच पाऊस पडतो. आपल्या भारत देशातील शेती प्रामुख्याने पावसावर आणि लहरी हवामानावर खूप अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अभ्यास असणे खूप आवश्यक होते. सतरा अठराव्या शतकाच्या दरम्यान पार्‍याच्या तापमापक (थर्मामीटर/Thermometer) आणि वायुभारमापक (बरोमीटर/Barometer) यांचा शोध लागला होता. या दोन यंत्रांमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याची शक्यता खूप वाढली होती म्हणून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर करुन हवामानाचा आधुनिक अभ्यास करण्यासाठी १८२३ साली मुंबईच्या कुलाबा येथे वेधशाळा उभारली व ती पुढे कुलाबा वेधशाळा म्हणून ओळखू लागली. येथे सुरुवातीला हवामान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करत त्यांच्या नोदी करत असत. १८४० साली येथे चुंबकाकर्षकमापन (Magneto Meter) यंत्रे बसविण्यात आली. तेव्हापासून येथे पृथ्वीवरील चुंबकीय लहरींचा देखील अभ्यासास सुरुवात झाली आणि या सर्व मापकांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. या मापनांमध्ये सुसुत्रता यावी म्हणून दर दोन तासांनी नियमित मापने घेणे सुरू झाले.


      या वेधशाळेवर १८९६ सालापर्यंत ब्रिटिश अधिकार्‍यांचेच प्रमुखपदावर वर्चस्व होते. १८९६ साली या वेधशाळेचे पहिले भारतीय प्रमुखपद भुषविले ते डॉक्टर नानाभाई अर्देशीर मूस या पारसी व्यक्तीने. डॉक्टर नानाभाई यांनी या वेधशाळेत खूप नवनवीन सुधरणा करण्यासोबत भूकंपमापनदेखील सुरू केले.

 

    मुंबईमध्ये १९०० साली घोड्‍याच्या ट्रामच्या ऐवजी विजेवर चालणार्‍या ट्राम चालवण्याचे ठरले. पण मुंबईत पसरणार्‍या विजेच्या तारांमुळे ज्या नैसर्गिक चुंबकीय मापने मिळत होती ती चुकण्याची शक्याता वाढण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा मुंबईजवळील अशा ठिकाणांचा अभ्यास सुरू झाला ज्या ठिकाणी मुंबईसारखी मापने मिळतील. मुबंईच्या दक्षिण पुर्वेला असलेल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या किनारी नवीन भूचुंबकीय वेधशाळा बांधण्याचे ठरले. ही वेधशाळा बांधताना बाहेरील चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊनच केले. त्यासाठी खास पोरबंदरहून चुंबकीय गुणधर्म रहीत असेच दगड मागवून, वास्तूत वापरणार्‍यात येणार्‍या नाजूक यंत्रणेला जराही धक्‍का पोहोचणार नाही अशा पध्दतीने दोन वास्तूंचे बांधकाम पूर्ण केले.


    ही भूचुंबकीय वेधशाळा बांधून झाल्यावर सुमारे दोन वर्षे मुंबई आणि अलिबाग येथील वेधशाळांमध्ये एकाच वेळी मापने घेण्यात येत होती, आणि त्यांची तुलना करून झाल्यावर दोन्ही वेधशाळेतील मापनामध्ये साम्यता आढळून आली, त्यानंतरच अलिबागच्या वेधशाळेला अधिकृत मान्यता देण्यात आली. तेव्हापासून अलिबागच्या भूचुंबकीय वेधशाळेने आजपर्यंत सुमारे ११६ वर्षे अविरत एकदाही खंड न पडता अचूक मापने करत आहे. या वेधशाळेने केलेल्या अचूक मापनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते.

 

    आपल्या भारत देशाच्या नौदल आणि वायुदलासाठीही या वेधशाळेच्या मापनांचा उपयोग केला जातो.


    सध्द्‍या डी आय फ्लक्स मॅग्नेटोमीटर, जेम सिस्टीम, प्रोटोन प्रिसिशन मॅग्नोमीटर, ओव्हरहाउसर इफेक्ट प्रोटोन स्केलर मग्नेटोमीटर अशा विविध मोजणी यंत्रणांनी ही अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा सुसज्ज आहे.

 

    येथे छोटे संग्रहालय सुद्धा आहे. भेट देण्यासाठी येथील अधिकार्‍यांना पुर्वसुचना देऊन संग्रहालय पाहण्यास परवानगी घेता येते. हे संग्रहालय फक्त कामकाजाच्या पाच दिवशीच सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यानच पाहू शकता.

 

    तर अशा या भारतातील पहिल्या आणि जागतिक दुसर्‍या क्रमांकाची वेधशाळा असलेल्या आपल्या महाराष्ट्राची मानबिंदू असलेल्या अलिबागच्या भूचुंबकीय वेधशाळेला कधी भेट देता.

 

जवळील ठिकाणे : अलिबाग समुद्रकिनारा, समुद्रात असलेला कुलाबा किल्ला, काशिद समुद्रकिनारा, मुरुड-जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला इत्यादी...

 

कसे जायचे : मुंबई मधून रस्त्याने यायचे झाले तर पनवेल, पेण, वडखळ मार्गे अलिबागला येऊ शकता तेथून के. ई. एस. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल जवळ येऊन वेधशाळेला भेट देऊ शकता.

 

मुंबई मधून जलमार्गाने यायचे झाले तर मांडवा किंवा रेवस येथे उतरुन अलिबाग रेवस मार्गाने के. ई. एस. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल येऊन वेधशाळेला भेट देऊ शकता.

 

पुण्यावरुनही येथे खंडाळा घाट, वडखळ मार्गे अलिबागला येऊ शकता.

 

 

कधी जायचे : नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान येथील वातावरण आल्हाददायक असते.

 

तालुका : अलिबाग

 

जिल्हा : रायगड

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple