फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील १७,२५० एकर जागेवर जंगल, गवत आणि दलदल यांनी व्यापलेला भूभाग म्हणजेच फणसाडचे जंगल. फणसाडचे जंगल रोहा येथून मुरुडकडे जाणार्‍या वाटेवर काशिद समुद्र किनार्‍यापासून कुंडलिका नदीदरम्या पसरलेले आहे. स्वातंत्रापूर्वी शिकारीसाठी मुरुड जंजिर्‍याच्या सिध्दी नवाब यांच्या राज्यकर्त्यांसाठी हे जंगल राखीव होते. भारत स्वातंत्र्यानंतर वनविभागाकडे या जंगलाची जबाबदारी आली आणि १९८६ साली तत्कालीन सरकारने या जंगलातील जैवविविधता जोपासण्यासाठी फणसाड जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला.


    या अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, शुष्क पानझडी प्रकारातली झाडे आहेत. येथे आयन, आंबा, सागवान, अंजन, जांबा, जांबुळ व अनेक औषधी झाडे अशा एकून ७१८ प्रजातीच्या वनस्पती, झुडपे तसेच विविध प्रकारची फुलझाडे आढळतात.


    या अभयारण्यात बिबट्या, हरण, सांभर, रान डुक्कर, भारतीय राक्षसी खारुताई (Ratufa indica), भेकर, तरस यांसारख्या प्राण्यांच्या १७ प्रजाती याचबरोबर शिक्रा, हॉक गरुड, क्रेस्टेड सर्प गरुड, केस्ट्रल, हरियाल (हिरवे कबूतर), असे एकूण पक्ष्यांच्या १६४ प्रजाती, सापांच्या २७ प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारची रंगांची फुलपाखरांच्यासुद्धा ९० प्रजाती या अभयारण्यात दिसतात. अभयारण्यात हमखास पशु पक्षी दिसतील असे गुन्याचल माळ, चिखलगाव, फणसाडगाण ही मुख्य पाणवठ्याची ठिकाणं आहेत.

 

    वन्यजीव छायाचित्रण (Wildlife Photography) करणार्‍यांसाठी नंदनवन ठरावे असे हे ठिकाण असल्यामुळे येथे विविध खाजगी शिबिरेसुद्धा आयोजित केली जातात.

 

    बरे येथे जाताना सोबत पाण्याची पुरेशी बाटली, ग्लुकॉन-डी किंवा इलेक्ट्रोल पावडर, चांगले स्पोर्ट शूज किंवा ट्रेकिंग शूज, छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा, वन्यजीवांचे निरिक्षण करण्यासाठी दुर्बिण, टोपी, गॉगल, प्रथमिक उपचाराची पेटी, अवश्यतेवढे खाण्याचे पदार्थ अवश्य घेऊन जाणे.

 

    येथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.

 

    आणि सर्वात शेवटचे अभयारण्यात आपल्यामुळे वन्य पशु पक्षांना, पर्यावरणाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि कुठेही कचरा करु नका.

 

जवळील ठिकाणे : पावसाळ्यात फणसाड धबधबा, किहिम समुद्र किनारा, अलिबाग, मुरुड-जंजिरा इत्यादी...


कसे जायचे : स्वत:च्या वाहनाने मुंबई मधून अलिबाग रस्त्याने जाताना वाटेतच अभयारण्य लागते. किंवा मुंबई अलिबाग एस.टी. ने सुद्धा फणसाड अभयारण्य स्थानकात उतरता येते.


कधी जायचे : ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन अखेर दरम्यान


जिल्हा : रायगड


राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple