भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य - Bhimashankar Wildlife Sanctuary
भीमाशंकर म्हटले की पहिली ओळख येते ती म्हणजे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक, स्वंभू शिवलिंग असलेले शिवशंकराचे मंदिर. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या कुशीत, आणि पुण्यातील खेड तालुक्यात वसलेले एक तिर्थक्षेत्र तसेच थंड हवेचे ठिकाण. येथे नेहमी भाविक, निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, पशू पक्षीनिरिक्षक, वनौषधींचे अभ्यासक यांचा राबता असतो.
येथे येणारे सर्वजण या हेमांडपंथी बांधकाम, नक्षीकाम असलेले भीमाशंकर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. या मंदिरात चांदीचे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील आवारात दोन मोठे दगडी नंदी, तसेच वसईच्या युध्दात पेशव्यांनी जिंकलेली एक विशाल घंटा ठेवलेली पहावयास मिळते. भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, त्यावेळी लाखो भाविक मोठ्या श्रध्देने मंदिराला भेट देतात.
मंदिराच्या पुर्व दिशेने थोडे खाली उतरले की जंगलाची सुरुवात होते. भीमाशंकरचे जंगल ठाणे, रायगड, पुणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये साधारण १२०-१२५ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. हे जंगल उंचच उंच झाडींनी वेढलेले आहे, त्यामुळे जंगलात सहसा सूर्यप्रकाश जमिनीवर पोचतसुध्दा नाहीत, त्यामुळे येथे सदैव थंड वातावरण असते. या जंगलात सागवान, हिरडा, फनसाल, शेंद्री, अंजन, जांभळ इत्यादी बर्याच प्रकारची झाडे, औषधी वनस्पती, वेली या जंगलात आढळतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेले शेकरु (उडणारी खार), खवले मांजर, भेकर, हरण, सांबर, चितळ, तरस, कोल्हे, रानडुक्कर, ससे, वानर इत्यादी प्राणी तसेच सर्पगरुड, गरुड, बुलबुल, मोर, लांडोर असे पक्षी देखील मोठ्याप्रमाणात येथे आढळतात. सरपटणारे प्राणी, रंगीबेरंगी विविध प्रजातीची फुलपाखरेही येथे आढळतात. विषेश करून अर्धा फूट लांबीचे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरुही येथे पहायला मिळते. एवढी सगळी वनसंपदा, विविध वन्यजीव आणि जैविक समृध्द जीवन या जंगलात असल्यामुळे या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे.
भीमाशंकर अभयारण्यातील इतर प्रेक्षणिय स्थळे:
गुप्त भीमा : जंगलात फिरताना एका दरीत मोक्षकुंड दिसते या ठिकाणी मुख्य मंदिराजवळील कुंडातून जमिनीखालून वाहत येऊन या मोक्षकुंडातून येणारे पाणी या ठिकाणी नदीचे रुप धारण करते, म्हणूनच या स्थळाला "गुप्त भीमा (गुप्त भीमाशंकर)" असे संबोधतात. जिथे भीमा नदी उगम पावते त्या ठिकाणी लहान स्वरुपात वाहणार्या झर्याचे पावसाळ्यात मोठ्या धबधब्यात रुपांतर होते.
नागफणी पॉइंट :
अंजनीमाता मंदिराच्या मागील बाजूने वर चढून गेल्यानंतर नागफणी पॉइंट दिसतो. या पॉइंटला आल्यावर तेथून दिसणार्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, माथेरानचा परिसर न्याहळताना तिथे मन खिळून राहते.
सनसेट पॉइंट :
या ठिकाणाहून सूर्यास्ताच्यावेळी माथेरान आणि हाजीमलंग (मच्छिंद्रगड) परिसराचे जे अविस्मरणीय नयनरम्य दृश्य असे दिसते की त्याला तोड नाही.
कलामजा मंदिर :
हे एक वैशिट्यपूर्ण मंदिर आहे, येथे तुम्हाला कोणत्याही देवाची किंवा देवीची मुर्ती दिसणार नाही, तर इथे कळंब नावाच्याच एका झाडाला देवी मानून आदिवासी लोक पूजाअर्चा करतात.
भीमाशंकर येथे राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे, तसेच इथे येण्यासाठी बर्याच ट्रॅव्हलर्सची पॅकेजेसही उपलबध्द असतात.
शेवटी एक नेहमीची सूचना : येथे फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास येथील वन्याजीवांना होणार नाही याची काळजी घ्या, आणि परिसराची स्वच्छता राखा.
भीमाशंकर या परिसराला एकदा निवांत भेट द्या आणि खुपसार्या आठवणी सोबत घेऊन जा.
कसे जायचे : मुंबई मधून चेंबूर, ठाणे, कल्याण येथून भीमाशंकरसाठी एस.टी. बस सेवा उपलबध्द आहेत. तसे स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर मुंबई-कल्याण-मुरबाड-जुन्नर माळशेज घाट मार्गे आणि दुसरा मुंबई बंगलोर महामार्गावरुन तळेगाव-चाकण मार्गानेही जाऊ शकता.
पुणे बस स्थनकातूनही भीमाशंकरसाठी बसची सुविधा उपलबध्द आहेत. गाडीने जायाचे झाल्यास पुणे-नाशिक मार्गावरील मंचर येथून डाव्या वळणाला भीमाशंकरच्या रस्त्याने भीमाशंकर या ठिकाणी येऊ शकता.
कधी जायचे : ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यांदरम्यान
जिल्हा : पुणे
राज्य : महाराष्ट्र
धन्यवाद, लेख कसा वाटला ते आवर्जून कमेंट मध्ये आपले मत नोंदवून सांगा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know