थिबा राजवाडा - Thiba Palace
१८८५ साली ब्रिटिशांनी ब्रम्हदेशावर कब्जा करत सात वर्षे राज्य करणार्या थिबा राजा आणि परिवाराला बंदी केले. ब्रम्हदेशावर राज्य करणारा शेवटचा राजा म्हणजेच राजा थिबा. राजाने पुन्हा उठाव करु नये म्हणून बंदी केलेल्या राज परिवाराला तत्कालिन मद्रास मार्गे रत्नागिरीला आणले व येथे स्थानबध्द केले. पण राज परिवाराला जेथे उतरवण्यात आले होते तेथे राज परिवाराला साजेशा सुविधा पुरविता येत नव्हत्या म्हणून १९१० साली सुमारे २७ एकराच्या प्रशस्थ जागेवर सर्व सोयींनी सुसज्ज असा तीन मजली राजवाडा बांधला. आणि थिबा राजाच्या राजपरिवाराला मग या राजवाड्यात नजरकैद करून ठेवले. थिबा राजाचा आपल्या मायभूमी, प्रजेपासून दूर जवळ जवळ ३० वर्षाच्या नजरकैदेत वयाच्या ५८ व्या वर्षी १९१९ साली मृत्यू झाला. अशा या राजाच्या या राजवाड्यातील वास्तव्यामूळे हा राजवाडा "थिबा राजवाडा" म्हणून प्रसिध्द झाला.
राजाला वेगवेगळ्या कलांचे शौक असल्यामुळे राजवाड्यात तळ मजल्यावर संगमरवरी नृत्यगृह उभारले होते. राजवाड्याचे बांधकामसुद्धा अप्रतिम असे आहे. या राजवाड्याच्या बांधकामावर ब्रम्हादेशच्या वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो ते येथील छतांच्या लाकडांवर लावलेल्या सुंदर नक्षीकाम असलेल्या पट्ट्या तसेच खिडक्यांना बसवलेल्या रंगीत इटालियन पध्दतीच्या काचांमुळे.
थिबा राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तूंचे संग्रहालय बनवले आहे. वरील मजल्यावर चित्रांचे प्रदर्शन देखील आहे, तसेच अनेक प्राचीन मुर्त्यादेखील राजवाड्यात आहेत.
राजवाडा पाहून झाल्यावर येथून जवळच असलेल्या थिबा पॉइंटला सायंकाळी भेट द्यावी कारण येथून मावळणारा सूर्य क्षितीजाआड जाताना दिसणारे दृश्य अवर्णनीय असे असते, सोबत तुम्हाला जवळ असणार्या भगवती किल्ला, भाट्ये खाडी, राजिवडा बंदर परिसरही खुप सुंदर दिसतो.
राजवाड्याला फक्त सोमवार सोडून इतर दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत भेट देता येते.
जर रत्नागिरीला कधी गेलात तर अवश्य भेट द्या.
जवळील ठिकाणे : भगवती किल्ला, रतनगड किल्ला, भाट्ये समुद्र किनारा
कसे जायचे : मुंबई, पुणे, कोल्हापूर येथून रत्नागिरी एस. टी. बस स्थानकात उतरून हाकेच्या अंतरावर असलेल्या थिबा राजवाड्याला भेट देऊ शकता.
रेल्वेने यायचे झाले तर जवळील रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे तेथून बस स्थानकात येऊन थिबा राजवाड्याला भेट देऊ शकता.
कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही
तालुका : रत्नागिरी
जिल्हा : रत्नागिरी
राज्य : महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know