महाराष्ट्र निसर्ग उद्यान - Maharashtra Nature Park
जेष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या उपस्थितीत आंबा, पिंपळ, वड, उंबर आणि पळस ह्या स्थानिक पाच झाडांचे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वृक्षारोपण केले. मार्च १९९१ साली महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि या उद्यानाला लागूनच असलेल्या मिठी नदीतील खारफुटीचे जंगल मिळून बनलेल्या जवळजवळ १८० हेक्टर क्षेत्राला "संरक्षित वन" म्हणून घोषित केले.
सुरुवातीला येथे पहिला फक्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांनाच प्रवेश होता, कालांतराने मग सामान्य जनमाणसांत निसर्गाप्रती जनजागृती व्हावी या कारणास्तव काही माफक दरात प्रवेश शुल्क घेऊन सर्वांसाठी खुले केले. येथे विद्यार्थी आणि इतर नागरिकांना झाडा झुडूपांचा अभ्यास करिण्याकरिता शैक्षणिक केंद्र तसेच परिसरात निरिक्षणासाठी नागमोडी वाटा, जलाशय, तसेच विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांनी युक्त असलेली रोपवाटिका देखील उपलब्ध आहे. या रोप वाटिकेतून कोणीही रोपे विकत घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या रोपांची काळजी कशी घ्यायची याबाबतीतही मार्गदर्शन केले जाते.
या निसर्ग उद्यानात फक्त झाडेच आहेत असे नाही तर इथे बर्याच प्रजातीचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच अनेक सापांच्या प्रजातीही आढळतात. पक्षीनिरिक्षाणासाठी योग्य काळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिना असतो कारण येथे काही परदेशी पक्षांचे आगमन झाल्यामुळे तेही पाहण्यास मिळतात. येथे जाताना दुर्बीण अवश्य घेऊन जा म्हणजे पक्षीनिरिक्षणही चांगल्या प्रकारे करता येईल. या संरक्षित जंगलात बरीच जैवविविधताही आहे. जर तुम्ही निसर्ग फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेऊन जाणार असाल तर तुम्हाला त्याची रितसर पावती बनवावी लागते. येथे गाडी पार्किंगचीसुद्धा सशुल्क सुविधा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे कचरा निर्मुलन व्यवस्थेचे एक उत्तम उदाहरण असल्यामूळे येथे जगभरातील पर्यावरण अभ्यासक येथे या उद्यानाचा अभ्यास करण्यासाठी विशेष भेट देतात. या ठिकाणी निसर्ग तसेच पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी म्हणून उद्यानातर्फे विविध उपक्रम राबविले जातात.
तर अशा गडबडीच्या मुंबई शहराच्या मध्यावर असलेल्या मानव निर्मित जंगलाला भेट दिल्यावर मुंबईत असूनसुद्धा शहराबाहेर असल्याचा आनंद मिळेल. एकदा भेट दिलात तर या उद्यानाला वारंवार भेट द्यावीशी वाटेल.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान संबंधी अधिक माहितीसाठी, प्रवेश शुल्क संबंधी, विविध उपक्रमासंबंधी माहितीसाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
जवळील ठिकाणे : सायन किल्ला, वांद्रे किल्ला, दादर चौपाटी, इत्यादी...
कसे जायचे : सेंट्रल रेल्वेमधील सायन (शीव) स्थानक सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे येथून केवळ ९०० मीटर अंतर आहे चालत गेल्यास १० ते १५ मिनिटे लागतील. हर्बर रेल्वेमार्गावरील दोन रेल्वे स्थानके जवळ आहेत एक म्हणजे चुनाभट्टी आणि दुसरे गुरु तेग बहादुर नगर. चुनाभट्टी ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान साधारण दोन कि.मी अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला रिक्षाशिवाय पर्याय नाही, चालत जायचे झाल्यास सुमारे ३० मिनिटे लागतील आणि गुरु तेग बहादुर नगर स्थानकापासूनचे अंतर साधारण २.५ कि.मी अंतर आहे त्यामुळे येथून तुम्हाला टॅक्सीने जावे लागेल, चालत जायचे झाले तरी ३० मिनिटे लागतील. आणि पश्चिम रेल्वे मधील जवळचे स्थानक वांद्रे आहे. येथून साधारण ५ ते ६ कि.मी. अंतर आहे. वांद्रे स्थानकातून यायचे झाल्यास पश्चिमेकडून बस सेवा देखील उपलब्ध आहेत. जर रिक्षाने जायचे झाल्यास वांद्रे पुर्वेकडून जाणे सोयीचे आहे.
कधी जायचे : सार्वजनिक सुट्ट्या सोडून कधीही सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत उद्यान खुले असते.
तालुका : मुंबई
जिल्हा : मुंबई
राज्य : महाराष्ट्र
उपयुक्त माहिती 👌👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा