सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)
सज्जनगड म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते समर्थ रामदास स्वामी. कारणही तसे आहे म्हणा, निजामाकडून मराठ्यांनी हा जिंकून घेतला व शिवाजी महाराजांनी *(यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्या नसल्याकारणाने येथे शिवाजी महाराज असा उल्लेख केला आहे.) समर्थ रामदास स्वामींना गडावर कायमच्या वास्तव्यासाठी विनंती केल्यामुळे ते कायमचे वास्तव्यास आले व या गडाचे नाव नौरससातारा चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत.
तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत.
सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. अती प्रचीनकाळी याठिकाणी आश्वलायन ॠषी वास्तव्यास होते म्हणून तेव्हा आश्वलायनगड असे म्हणत असत. येथे ११ शतकात शिलाहार राजा भोज यांनी किल्ल्याची उभारणी केली. साधारत: १३५८ ते १३७५ च्या दरम्यान चवथा बगमनी राजा महंमदशहा याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. कालांतराने वारसाहक्काने हा किल्ला आदिलशहाकडे आला. त्यानंतर १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत जिंकून घेतला.
पायथ्यास असलेल्या परळी गावाकडील दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करता येतो म्हणून या किल्ल्यास परळीचा किल्लादेखील म्हणतात.
सज्जनगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यातील एक म्हणजे गजवाडी मार्गे सातारा ते परळी मार्गावर साधारण ७ कि.मी. अंतरावर गजवाडी गाव लागते. गजवाडी गावातून थेट सज्जनगडाच्या पायथ्याजवळ गाडीने जाता येते व तेथून पुढे १०० पायर्यांनतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर पोचण्यास १५-२० मिनिटे पुरतात.
दुसरा मार्ग परळी मार्गे सातारा ते परळी हे अंतर १० कि. मी. आहे. परळी गावातून गडाच्या मुख्य दरवाजा पर्यंत पोचण्यास साधारणत: ७७५ पायर्या असतील त्यामुळे गडावर पोचण्यास सुमारे एक तास लागतो.
बहूतेक जण हे गजवाडी मार्गेच सज्जनगड पहावयास जातात. पण तरुण आणि उत्साही पर्यटक हे परळी मार्गे येणे पसंत करतात.
गडावर जाताना अग्नेय दिशेस असलेला पहिला दरवाजा लागतो त्यास "छत्रपती शिवाजी महाराजद्वार" असे म्हणतात. आणि दुसरा पूर्व दिशेस लागतो त्यास "समर्थद्वार" असे म्हणतात.
दुसर्या दरवाज्यातून आत शिरताना समोरच एक फार्सी भाषेत लिहिलेला शिलालेख दिसतो.
पायर्यांनी गडावर प्रवेश करताना वाटेत एक झाड लागते. या झाडापासून उजवीकडे एक वाट जाते ती समर्थ रामदास स्वामींची एकांतात बसायची जागा रामघळ लागते. तसेच गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी असलेले घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागील बाजूस मशिद सारखी एक इमातर आहे त्याच्या समोरच आंगलाई देवीचे मंदिर आहे.
मंदिरालगतच वेणाबाईंचे वृंदावन, अक्काबाईंचे वृंदावन, ओवर्या, अशोकवन आणि समर्थ रामदास स्वामींचा मठ आहे. या जीर्णोद्धार केलेल्या मठातच शेजघर नावाची खोली आहे. यामध्ये समर्थांचा पितळी खुर असलेला पलंग, कुबडी, गुप्ती, दंडा, पाण्याचे दोन मोठाले हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पानाचा डब्बा, सोटा इत्यादी समर्थांच्या वस्तू आहेत.
तसेच गडावर ब्रम्हपिसा, धाब्याचा मारुती अशी बरीच मंदिरे आहेत. सर्वात मोठे आकर्षण असलेले म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना केली त्यानंतर माघ कृ. नवमीच्या दिवशी समर्थ रामदास स्वामींचे देहावसन झाले. तेव्हापासून माघ कृ. नवमीला दासनवमी असेही म्हणू लागले.
गडावर राहण्या जेवण्यासाठी सोयी आहेत. श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालयातर्फे खोल्या उपलब्ध होतात. तसेच धर्मशाळाही आहेत.
तर अशा या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या सातारातील सज्जनगडला भेट अवश्य द्या.
विशेष सुचना : परिसराची शांतता व स्वच्छता राखा.
तुम्हाला माहिती कशी वाटली ती आवर्जून कमेंट्स करून आम्हाला कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेआर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा). सबस्क्राईब करण्याकरीता वर भ्रमंती कट्टा च्या जवळ बटण आहे त्यावर क्लिक करुन सभासदस्य घेता येईल.
जवळील ठिकाण : सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावात दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. एक केदारेश्वर महादेव आणि दुसरे विरुपाक्ष, येथील कोरीव शिल्प मनमोहक आहेत.
कुस गावापासून जवळच असलेली प्रेक्षणीय मोरघळ नावाची गुहा आहे.
कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही.
कसे जायचे : मुंबईमधून यायचे झालेतर मुंबई बंगलोर द्रुतगती मार्गाने लवकर जाऊ शकता. हे अंतर साधारणपणे २७० कि. मी. आहे.
पुण्यावरून १२७ कि. मी. अंतरावर आहे.
तालुका : सातारा
जिल्हा : सातारा
राज्य : महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, Please let me know