जुहू गार्डन - Juhu Garden

    जुहू गार्डन म्हटले की सर्वांना लहानपणाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. कारण त्याकाळी मुंबईत गार्डनही मोचकीच होती त्यात या गार्डनमध्ये असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे हे गार्डन खुप प्रसिद्ध होते. आणि ते कारण म्हणजे या गार्डनमध्ये एक सिमेंटचे काँक्रिटचे बनवलेले विमान. हे गार्डन साधारणपणे ५० वर्षे जुने आहे. ते बृहन मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येते. सध्या हे गार्डन लायन्स जुहू म्युनिसिपल पार्क या नावाने ओळखले जाते.

 

   ज्याकाळात सामान्य व्यक्तीला विमान पाहणे आणि विमानात बसणे दुरापास्त होते त्याकाळात अबालवृद्धांचे विमानात बसण्याची हौस मौज पुरवणारे ठिकाण म्हणजेच हे जुहूचे गार्डन. तसे पाहिले तर जुहू समुद्र किनारी फिरायला जाणारे आवर्जून ह्या गार्डनला भेट देतात.

 

   तर हे विमान १९६० च्या दशकात एअर इंडिया या विमान सेवा पुरवणार्‍या कंपनीने बोईंग ७०७-४३६ या बनावटीच्या विमानाची सिमेंट काँक्रिटचे प्रतिरुप या गार्डनसाठी मुंबई महानगर पालिकेला भेट दिली आहे असे कळते. मध्यंतरी या विमानाचे काही अवशेष कोसळल्यामुळे अपघात झाला होता त्यामुळे हे गार्डन काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. पण आता ह्या गार्डनचे नवीन विमानासह नवीन स्वरुपात त्याचे लोकार्पण केले आहे. नवीन विमानात एकावेळी जास्तजण बसू शकतील तसेच कॉकपिट असलेल्या भागातही आसन व्यवस्था केली असल्यामुळे विमानात येणार्‍या मुलांमध्ये पायलट सीटवर बसण्याची मोठी चुरस दिसून येते. 


   या गार्डनमध्ये विमानाशिवाय लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे तसेच मोठ्‍या माणसांसाठी व्यायामाचे साहित्यही या गार्डनमध्ये बसविण्यात आले आहेत. एकूणच हे गार्डन सदा गजबलेले असते. कारण या गार्डनमध्ये वृक्षसंपदाही दाट असल्यामुळे बरेचजण येथे विसावा घेण्यासाठी तसेच भेटीगाठी करण्यासाठी या गार्डनचा आसरा घेतात. तसेच सकाळ संध्याकाळ येते जॉगिंग करणार्‍यांचाही चांगलाच राबता असतो.

 

    तर या सांताक्रूझ पश्चिमेकडील लिंक रोडवर असणार्‍या आणि बर्‍याच जणांच्या आठवणींना उजाळा देणार्‍या या गार्डनला बच्चे कंपनीसह एकदा अवश्य भेट द्या.

 

विशेष सुचना : या गार्डनचा परिसर व विमानाचा अंतर्गत भाग स्वच्छ राखा व निर्मळ आनंद अनुभवा.


      वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).

 

जवळील ठिकाणे : जुहू समुद्र किनारा, एस्कॉन कृष्ण मंदिर

 

कधी जायचे : कधीही वर्षाचे बारा महिने. सकाळी ६.०० ते दुपारी १२.०० आणि दुपारी ३.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते.

 

कसे जायचे : मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ पश्चिमेकडून लिंक रोडला जाणारी बस क्र. २३१ ची बस कमीत कमी भाडे आकारून गार्डनजवळ सोडते. तसेच स्थानकापासून ते गार्डनपर्यंतचे अंतर साधारण ९०० ते १००० मिटर असल्यामुळे चालतही १२-१५ मिनिटांत गार्डनला जाता येईल.

 

तालुका : जुहू, सांताक्रुझ

 

जिल्हा : मुंबई

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple