शिवनेरी किल्ला - Shivneri Fort
आज आपण जगप्रसिद्ध अशा शिवनेरी किल्ल्याबद्दल महिती घेणार आहोत. कारणही आज तसेच आहे ना आज दिनांक १९ फेब्रुवारी, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थळ तर आहेच पण तमाम शिवभक्तांचे श्रद्धास्थान देखील आहे.
तर असा हा शिवनेरी किल्ला १२ व्या शतकापासून डौलात उभा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर किंवा जुन्नेर हे जीर्णनगर म्हणून इसवीसनापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जुन्नर हे नाणेघाट डोंगररांगात वसलेले एक प्रचलित शहर होते. तसेच नाणेघाटातून फार मोठ्या प्रमणात व्यापारी वाहतूक चालत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग. कालांतराने येथे यादवांचे राज्य आले याच दरम्यान शिवनेरी दुर्गाला गडाचे स्वरूप आले. या शिवनेरी गडाने शकराजांपासून ते अगदी ब्रिटिश सांम्राज्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली पण सर्वात जास्त शिवनेरी किल्ला हा येथे झालेल्या बाल शिवाजी यांच्या जन्मस्थळामुळे जगप्रसिद्ध झाला.
राजमाता जिजाऊ गरोदर असताना शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून रातोरात शहाजी राजांनी ५०० स्वारांसोबत मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात सुरक्षित असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेले. तेव्हा किल्ल्यावरील श्रीभवानीमाता शिवाई ला राजमाता जिजाऊंनी साकडे घातले जर पुत्रप्राप्ती झाली तर तुझे नाव ठेवीन. अशा प्रकारे पुत्रप्राप्तीनंतर त्या बालकाचे नामकरण शिवाजी असे करण्यात आले, आणि त्या बालकाने पुढे जो काही इतिहास रचला ते तुम्हा आम्हा सर्वांनाच परिचित आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक साखळीची वाट जी थोडी बिकट अशी आहे, ज्यांना पर्वतारोहण, गिर्यारोहणाची सवय आहे अशांना ह्या वाटेने येताना एक चांगली अनुभुती मिळेल. या वाटेने येताना वाटेत काही लेण्यासदृष्य गुंफा देखील पहावयास मिळतील. या वाटेने किल्ल्यावर यायला साधारण ४०-४५ मिनिटे मागतात.
आणि दुसरा म्हणजे सात दरवाजांची वाट या वाटेने यायचे झाल्यास वाहणे आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आणू शकता व या सात दरवातून किल्ल्यात प्रवेश करू शकता. या वाटेने किल्ल्यावर पोचायला सुमारे दीड तास लागतो.
शिवनेरी गडावर पाहण्यासारखे असे बरेच काही आहे. सात दरवाजांच्या वाटेने गेले असता पहिला महादरवाजा लागतो, थोडे पुढे गेल्यावर दुसरा गणेश दरवाजा लागतो. तिसर्या दरवाजाला पिराचा दरवाजा असे म्हणतात, चौथा दरवाजा हा हत्ती दरवाजा म्हणून ओळखला जातो. पाचव्या शिपाई दरवाजाच्या उजव्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर "श्री. भवानीमाता शिवाई देवी"ची मुर्ती असलेले शिवाई मंदिर लागते. मंदिराच्या मागील भागी असलेल्या कड्यात ६-७ गुहा आहेत. सहावा दरवाजा याला मेणा दरवाजा म्हणतात, आणि शेवटच्या कुलुप दरवाजातून गडावर प्रवेश केल्याकेल्या समोरच पूर्वी धान्य साठवण्यासाठी असलेला अंबरखाना पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो. अंबरखान्याजवळून एक वाट टेकडीकडे जाते तेथे एक महादेव कोळी यांच्या स्मरणार्थ बांदलेला एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. तर दुसरी वाट शिवकुंजाजवळ जाते. येथे राजमाता जिजाऊ आणि बाल्शिवाजी यांचा पुर्णाकृती पुतळा असून समोर सभामंडप आहे. तेथून पूढे शिवजन्मस्थानाची दुमजली इमारत आहे. तळमजल्याच्या खोलीत जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे एक छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आहे तसेच दरवाजाच्या डाव्या बाजूला त्यांचा पाळणासुद्धा आहे. या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून संपुर्ण जुन्नर शहराचे विहंगम दृष्य दिसते. या इमारतीच्या समोरच बदामी पाण्याचे टाके आहे, तेथून पुढे कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता आहे. हा कडा सरळसोट असून सुमारे दीड हजार फूट खोल आहे त्यामुळे या कड्याचा उपयोग शिक्षा देण्यासाठी होत असे. किल्ल्याच्या परिसरातून नजर फिरवल्यास नाणेघाट, जीवधन, वडूज धरणाचे दर्शन होते. संपूर्ण किल्ला पूर्ण बघण्यास दीड दोन तास पुरेसे आहेत.
॥ जय भवानी ॥ जय शिवाजी ॥
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...
वरील माहिती कशी वाटली त्याबद्दलचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर सांगू शकता. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद (सबस्क्राईब करा) व्हा.
जवळील ठिकाणे : जीवधन किल्ला, वडूज धरण, नाणेघाट, लेण्याद्री
कसे जायचे : मुंबईहून माळशेज घाट मार्गे जुन्नर व तेथून थेट शिवनेरी किल्ल्यापर्यंत जाता येते. मुंबई ते शिवनेरी किल्ला अंतर साधारण १६० कि. मी. एवढे आहे आणि प्रवासाला ४ ते ४.३० तास लागतात.
पुण्याहून जायचे झाल्यास मंचर, नारायणगाव मार्गे जाता येते. हे अंतर साधारण १०० कि. मी एवढे असून प्रवास २.५० ते ३ तासांचा आहे.
नाशिकहून सुद्धा येथे सिन्नर, नारायणगाव मार्गे साधारण १५५ कि. मी. असून प्रवास २.५० ते ३ तासांचा आहे.
कधी जायचे : कधीही
तालुका : जुन्नर
जिल्हा : पुणे
राज्य : महाराष्ट्र
किल्ल्याच खूप सुंदर वर्णन केला आहे...
उत्तर द्याहटवाजणू स्वतःहून किल्यावर्ती आहोत..
सविस्तर माहिती बदल धन्यवाद...
धन्यवाद...
उत्तर द्याहटवा